ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
परळी-वैद्यनाथ : अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक अध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण कायद्याच्या निर्मितीसाठी मोलाचे योगदान देणारे ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने परळी-वैद्यनाथ येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष सौ. चित्रा देशपांडे यांनी केली. यावेळी त्यांनी ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या कार्याचा आणि विचारांचा आढावा घेत ग्राहकांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला.
ग्राहकांचे हक्क, ग्राहकांचे संरक्षण आणि ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी बिंदू माधव जोशी यांनी आयुष्यभर कार्य केले. ग्राहक हा बाजारव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असून त्याला आपल्या हक्कांची जाणीव असणे आवश्यक आहे, या विचारातून त्यांनी ग्राहक चळवळीला व्यापक स्वरूप दिले.
ग्राहकांची फसवणूक, अन्यायकारक व्यवहार आणि व्यापारी शोषणाविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देण्यासाठी नागरिकांना सक्षम करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे देशातील ग्राहक संरक्षण चळवळीला संघटित दिशा मिळाली.
“जागरूक ग्राहक – सक्षम समाज” हा विचार समाजात रुजविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेणे, ग्राहकांना त्यांच्या अधिकारांबाबत जागरूक करणे आणि शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी कार्यरत राहणे, हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष विद्या खिस्ते, तसेच सदस्य सुनिता बोडखे आणि सुरेखा बावस्कर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुरेखा बावस्कर यांनी केले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





