ओबीसी विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी सरकारी जागा एक रुपयात; महाज्योतीसाठी ३०० कोटींचा प्रस्ताव


ओबीसी विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी सरकारी जागा एक रुपयात; महाज्योतीसाठी ३०० कोटींचा प्रस्ताव

मुंबई : ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासह विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागासह अन्य शासकीय विभागांच्या मालकीच्या जागा नाममात्र एक रुपया दराने उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश महसूलमंत्री तथा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मंत्रालयात झालेल्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ओबीसी समाजाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्तीचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठवावा, तसेच वसतिगृह योजनांसह विविध प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी महाज्योती संस्थेसाठी ३०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद, वसतिगृह योजना तसेच व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गाशी संबंधित योजनांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट, समग्र ग्रंथ, चित्ररथ आणि अन्य उपक्रम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!