ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे अहंकारमुक्त व व्यसनमुक्त जीवनाचे आवाहन; दिंडी, कीर्तन, महाआरती व महाप्रसादाने चांडोळ जिल्हा बुलढाणा येथील मराठवाडा विदर्भ फिरती चतुर्थी कार्यक्रमाची सांगता


ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे अहंकारमुक्त व व्यसनमुक्त जीवनाचे आवाहन; दिंडी, कीर्तन, महाआरती व महाप्रसादाने चांडोळ जिल्हा बुलढाणा येथील मराठवाडा विदर्भ फिरती चतुर्थी कार्यक्रमाची सांगता

चांडोळ, ता. जि. बुलढाणा/ प्रतिनिधी महेंद्र बेराड : फिरती चतुर्थी वारकरी मंडळ, मराठवाडा–विदर्भ अंतर्गत एकदिवसीय कीर्तन महोत्सव श्रीक्षेत्र राजगणेश संस्थान, चांडोळ येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात दिंडी प्रदक्षिणा, जाहीर कीर्तन, महाआरती आणि महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ४ ते ५ वाजता दिंडी प्रदक्षिणेने झाली. त्यानंतर ५ ते ७ वाजता ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज शेलुदकर यांचे जाहीर कीर्तन झाले. कीर्तनातून त्यांनी मानवी जीवनाचे महत्त्व, वेळेचे मूल्य, भक्ती आणि संतविचार यावर मार्गदर्शन केले.

“मानवी जीवन अनमोल आहे, तसेच वेळही अनमोल आहे. मानवाने अहंकारमुक्त आणि व्यसनमुक्त जीवन जगावे. भागवत भक्ती करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा,” असे आवाहन ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज शेलुदकर यांनी कीर्तनातून केले. त्यांच्या प्रभावी कीर्तनाला उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाळ-मृदंगाच्या गजराने आणि हरिनामाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.

या कार्यक्रमास ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज शेलुदकर, ह.भ.प.विष्णू सास्ते नाना पिंपळगाव रेणुकाई, ह.भ.प.अंबादास महाराज लोखंडे पारध, अशोक महाराज, शिवा महाराज, मोरेश्वर महाराज, सागर महाराज भोंडे, गोपाळ महाराज आणि प्रविण महाराज लोखंडे यांच्यासह भजनी मंडळींची उपस्थिती लाभली. महिला भाविकांसह धाड, सावळी, चांडोळ तसेच परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

कीर्तनानंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर भगवान महेर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित हजारो भाविकांनी महाआरती आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

फिरती चतुर्थी वारकरी मंडळाच्या माध्यमातून मराठवाडा–विदर्भ परिसरात वारकरी संप्रदायाची परंपरा, संतविचार आणि भक्तीचा प्रसार करण्याचे कार्य सुरू आहे. यापुढील मराठवाडा–विदर्भ फिरती चतुर्थी कुंबेफळ, ता. जि. बुलढाणा येथे आयोजित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सांगता “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” च्या जयघोषात भक्तिमय वातावरणात झाली. आयोजकांच्या नियोजनामुळे कार्यक्रम उत्साहात आणि सुरळीतपणे पार पडला.


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!