ठाण्यात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या; प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला घटनेचा थरार
ठाणे:ठाण्यात काल रात्री ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूर्णेकर यांच्या कार्यालयासमोर आधी त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर ५ राउंड गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा एक थरारक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी महिला रेणू प्रजापती यांनी थरारक अनुभव सांगितला आहे. त्या म्हणाल्या, “मी घरात कपडे शिवत असताना अचानक गोळ्या झाडल्याचा मोठा आवाज झाला. त्यामुळे मी आणि माझी मुलगी तत्काळ घराबाहेर आलो. त्यावेळी आरोपीच्या हातात चाकू होता. हल्ला केल्यानंतर हे सर्व आरोपी दुचाकीवरून फरार झाले.”
अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र घबराट पसरली असून पोलीस प्रशासनाकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी





