पिंपळगाव रेणुकाई परिसरात दुष्काळी पाहणी; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामे
शासनाच्या आदेशानुसार पाहणी; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी
पिंपळगाव रेणुकाई |प्रतिनिधी /महेंद्र बेराड
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शेतशिवारात प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात आले. शासनाने दिलेल्या आदेशानुसार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे. या पाहणीदरम्यान तलाठी गाडेकर, ग्रामपंचायत अधिकारी समाधान सोनवणे, कृषी सहायक तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, पिकांची सद्यस्थिती आणि शेतीच्या नुकसानीची माहिती जाणून घेण्यासाठी प्रशासनाने थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनाम्याची प्रक्रिया राबविण्यात आली.
शासनाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद प्रत्यक्ष शेतशिवारात घेतली जात आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्याच्या दृष्टीने पंचनाम्यांना महत्त्व आहे. त्यामुळे पंचनामे अचूक आणि पारदर्शक पद्धतीने करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, पावसाच्या लहरीपणामुळे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने आगामी काळातील आर्थिक नियोजनाचा प्रश्नही शेतकऱ्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत केवळ पंचनामे करून न थांबता शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून ती प्रत्यक्ष त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
पिंपळगाव रेणुकाई परिसरात सुरू असलेल्या या पाहणीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुस्थिती प्रशासनासमोर येत आहे. आता पंचनाम्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार तातडीने मदत मिळणार का, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





