पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय नियामक मंडळावर अण्णासाहेब बनसोडे यांची विश्वस्तपदी निवड
पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय नियामक मंडळावर विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा. अण्णासाहेब बनसोडे यांचा पिंपरी-चिंचवड येथे भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
या निवडीबद्दल अण्णासाहेब बनसोडे यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदासजी आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजयजी शिरसाट, आमदार गोपीचंदजी पडळकर, माजी आमदार विलासशेठ लांडे तसेच पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर योगेशभाई बहल यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीचा मार्ग दाखविला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सुरू आहे. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
अण्णासाहेब बनसोडे यांची विश्वस्तपदी झालेली निवड ही शिक्षण क्षेत्रासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाची मानली जात असून, त्यांच्या माध्यमातून संस्थेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
सोहळ्याला विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी – शाम शिरसाठ, पिंपरी चिंचवड ,पुणे








