प्रणवी उर्सने रचला इतिहास; एशियन गेम्समध्ये गोल्फचे सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला
नवी दिल्ली : भारतीय गोल्फपटू प्रणवी उर्स हिने एशियन गेम्स २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत महिलांच्या वैयक्तिक गोल्फ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसह एशियन गेम्समध्ये गोल्फचे सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.
२३ वर्षीय प्रणवीने अंतिम फेरीत दमदार खेळ करत सिंगापूर आणि चीनच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तिच्या या विजयामुळे एशियन गेम्सच्या वैयक्तिक गोल्फ प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तिची भर पडली.
यापूर्वी लक्ष्मण सिंग यांनी १९८२, तर शिव कपूर यांनी २००२च्या एशियन गेम्समध्ये वैयक्तिक गोल्फमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे प्रणवी ही या प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
प्रणवीच्या या ऐतिहासिक विजयाने भारतीय गोल्फच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, तिच्या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी








