खोट्या ड्रग्ज गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; २२ वर्षीय आयटी इंजिनियरची आत्महत्या
पुणे : बनावट पोलीस अधिकारी असल्याचे भासवून ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील खराडी येथे समोर आला आहे. या कथित धमकीमुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागलेल्या २२ वर्षीय आयटी इंजिनियर शिखर कुमार सक्सेना याने इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.
या प्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून खराडी पोलिसांनी अजय कुमार भाटिया आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित व्यक्तींनी बनावट पोलीस अधिकारी असल्याचे भासवून तरुणाला खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेमुळे सायबर फसवणूक आणि बनावट पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने केल्या जाणाऱ्या धमक्यांचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खराडी पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
मो. ९८२२५४८४२९





