महागड्या ब्रेसलेटची ऑर्डर रखडली; कल्याणमध्ये सराफ व्यावसायिक बेपत्ता!
ऑर्डर वेळेत पूर्ण न केल्याने ग्राहकाचे तीन जणांसह घरी आगमन; दुकानात घेऊन गेल्यानंतर सराफ परतलाच नाही, पत्नीची पोलिसांत तक्रार
कल्याण : महागड्या ब्रेसलेटची ऑर्डर ठरलेल्या वेळेत पूर्ण न केल्याच्या कारणावरून कल्याणमध्ये सराफ व्यावसायिकाचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लक्ष्मीकांत अधिकारी असे बेपत्ता झालेल्या सराफ व्यावसायिकाचे नाव असून, त्यांच्या अचानक बेपत्ता होण्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने लक्ष्मीकांत अधिकारी यांच्याकडे महागड्या ब्रेसलेटची ऑर्डर दिली होती. मात्र, ठरलेल्या वेळेत ब्रेसलेट तयार न झाल्याने तीन जण त्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी ऑर्डर पूर्ण न झाल्याबाबत जाब विचारला. त्यानंतर हे तिघे लक्ष्मीकांत यांना त्यांच्या दागिन्यांच्या दुकानात घेऊन गेले.
मात्र, दुकानात गेल्यानंतर लक्ष्मीकांत अधिकारी पुन्हा घरी परतलेच नाहीत. बराच वेळ होऊनही ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. अखेर त्यांच्या पत्नीने कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, संबंधित व्यक्तींच्या हालचालींचाही मागोवा घेतला जात आहे.
ब्रेसलेटच्या ऑर्डरवरून झालेला वाद नेमका कोणत्या टोकाला गेला? लक्ष्मीकांत अधिकारी यांचे अपहरण झाले की ते अन्य कारणाने बेपत्ता झाले? याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे.
लक्ष्मीकांत अधिकारी यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांची चिंता वाढली असून, पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया








