स्वीकृत नगरसेवक नियुक्ती प्रक्रियेवर सचिन काळभोर यांचा आक्षेप; फेरविचाराची आयुक्तांकडे मागणी


स्वीकृत नगरसेवक नियुक्ती प्रक्रियेवर सचिन काळभोर यांचा आक्षेप; फेरविचाराची आयुक्तांकडे मागणी

आठ महिन्यांच्या विलंबानंतर जाहीर झालेल्या नियुक्त्यांची कायदेशीर पडताळणी करा; प्रक्रिया स्थगित करून नव्याने राबविण्याची मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक (नामनिर्देशित सदस्य) नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे निवेदनाद्वारे फेरविचार करण्याची मागणी केली आहे. नियुक्ती प्रक्रियेत झालेला विलंब, नियमांचे पालन आणि सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळाली का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसाठी प्रशासनाने राजकीय पक्षांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने आपल्या वाट्याच्या तीन सदस्यांची नावे मार्च महिन्यातच सादर केली होती. मात्र, भाजपच्या वाट्याच्या सात सदस्यांची नावे निश्चित होण्यास तब्बल आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागला. अखेर २० नोव्हेंबर रोजी भाजपने सात नावांची घोषणा केली.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती) नियम, २०१२ मधील तरतुदींचे पालन झाले आहे का, असा सवाल सचिन काळभोर यांनी उपस्थित केला आहे. विहित मुदतीनंतर सादर झालेल्या प्रस्तावांचा स्वीकार कोणत्या नियमांच्या आधारे करण्यात आला, याचाही खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नियुक्ती प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांना समान निकष आणि समान संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेची कायदेशीर व प्रशासकीय पडताळणी करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित नियुक्ती प्रक्रिया स्थगित करून पारदर्शक पद्धतीने नव्याने प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कायदेशीर पडताळणी पूर्ण होईपर्यंत संबंधित नियुक्त्यांना स्थगिती देण्याबाबत प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, असेही सचिन काळभोर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

प्रतिनिधी विजय अडसूळ


86
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!