घरखर्चासाठी पैसे न दिल्याने वडिलांनी मुलावर अॅसिड हल्ला; पुण्यातील केळेवाडीत धक्कादायक घटना
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातील केळेवाडीत घरखर्चासाठी पगारातील पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून वडिलांनी स्वतःच्या मुलावर अॅसिड हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्याम कदम (वय ६२) यांनी झोपेत असलेल्या आपल्या मुलगा तुषार कदम (वय ३०) याच्या चेहऱ्यावर अॅसिड ओतले. या भीषण हल्ल्यात तुषारचा चेहरा आणि शरीराचा काही भाग गंभीररीत्या भाजला असून डोळ्यांनाही मोठी इजा झाली आहे.
जखमी तुषार कदम याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेनंतर आरोपी वडील फरार झाले असून कोथरूड पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.
या अमानुष प्रकारामुळे पुण्यात संताप व्यक्त होत असून कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.










