UPSC परीक्षेत नगरचा डंका ! पाथर्डीच्या लोहार कुटुंबातील अक्षय पवारची आयएफएस पदावर गरुड झेप.


UPSC परीक्षेत नगरचा डंका ! पाथर्डीच्या लोहार कुटुंबातील अक्षय पवारची आयएफएस पदावर गरुड झेप


श्रीरामपूर प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील लोहार काम करणाऱ्या कुटुंबातील २७ वर्षीय अक्षय हरिभाऊ पवार याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत ८१ वी रँक मिळवत ‘आयएफएस केंद्रीय वन अधिकारी’ पद पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या अक्षयने घरच्या पारंपरिक लोहार कामात आई-वडिलांना मदत करत शिक्षण पूर्ण केले. त्याचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण श्री तिलोक जैन विद्यालयात झाले. पुढे पुणे येथे बी.टेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने २०२२ पासून UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
विशेष म्हणजे कोणताही क्लास न लावता स्वअभ्यासाच्या जोरावर त्याने स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू ठेवला. सलग तीन वर्षे अपयश आले तरीही अक्षय खचला नाही. आई-वडिलांचे कष्ट, घरची परिस्थिती आणि स्वतःची जिद्द डोळ्यासमोर ठेवून त्याने सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.
अखेर कठोर मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि दिल्लीतील एका संस्थेच्या मदतीमुळे त्याने UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवत आयएफएस पदावर झेप घेतली.
अक्षय पवार यांच्या यशाबद्दल विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात येत असून, लोहार समाजाच्या वतीनेही त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील युवकांसाठी अक्षय पवार प्रेरणास्थान ठरत असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही यश मिळवता येते, हे त्याने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

प्रतिनिधी : दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!