’गाडीत डिझेल नाही, मुलीला कसे शोधणार?’; नागपूर पोलिसांचा अजब कारभार
नागपूर: शहरात सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या असंवेदनशीलतेचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या पाचपावली परिसरातून एक २१ वर्षांची तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन गेलेल्या कुटुंबाला, ‘गाडीत डिझेल नाही, आम्ही मुलीला शोधायला कसे जाणार?’ असे उत्तर पोलिसांनी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका कुटुंबातील तरुणी बेपत्ता झाली होती. घाबरलेले कुटुंबीय तातडीने पोलिसांकडे मदत मागायला गेले. मात्र, पोलिसांनी इंधनाचे कारण पुढे करत तपासासाठी असमर्थता दर्शवली. यानंतर संतप्त आणि हतबल झालेल्या नागरिकांनी स्वतः पैसे गोळा करून पोलिसांना डिझेलसाठी दिले.
नागरिकांनी पैसे दिल्यानंतर हालचालीत आलेल्या पोलिसांनी अखेर तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपासाअंती, सदर तरुणी प्रेमप्रकरणातून घर सोडून निघून गेल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी तिचा शोध घेतला आहे.
एकीकडे पोलीस हायटेक झाल्याच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे इंधनासाठी सामान्य नागरिकांकडून पैसे घेण्यापर्यंत मजल गेलेल्या या प्रकारामुळे नागपूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या असंवेदनशील कारभारामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






