जहांगीर हॉस्पिटलचा अमानवीय चेहरा: अवघ्या १३ तासांचे बिल ३.२५ लाख, पैशांसाठी मृतदेह अडवला!
पुणे: पुण्यातील नामांकित जहांगीर हॉस्पिटलमधील एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णाच्या उपचारासाठी अवघ्या १३ तासांचे तब्बल ३ लाख २५ हजार रुपयांचे बिल आकारण्यात आले असून, विम्याचे (इन्शुरन्स) पैसे मिळेपर्यंत रुग्णाचा मृतदेह ताब्यात देण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णाला अत्यवस्थ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही तासांच्या उपचारानंतर रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर हॉस्पिटलने दिलेल्या बिलाचा आकडा पाहून नातेवाईकांना मोठा धक्का बसला. केवळ १३ तासांच्या उपचारासाठी सव्वा तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
दुर्दैवी बाब म्हणजे, नातेवाईकांनी इन्शुरन्सची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मृतदेह देण्याची विनंती केली असता, रुग्णालय प्रशासनाने ती फेटाळून लावत मृतदेह रोखून धरला. या प्रकारामुळे रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, खासगी रुग्णालयांच्या अशा मनमानी कारभारावर आणि अमानवीय वागणुकीवर सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429









