जळगाव गोलाणी मार्केट परिसरात विजेच्या डीपीला आग; अग्निशामक दलाची तत्परता
जळगाव : जळगाव शहरातील गोलाणी मार्केट भागात आज दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगनिशामक दलाच्या ऑफिस क्रमांक ०१ च्या बाजूलाच असलेल्या विजेच्या डीपीमध्ये तापमान वाढल्याने शॉर्टसर्किट झाले. परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरडे गवत असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पंपाच्या सहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. वेळीच उपाययोजना केल्यामुळे आग अधिक पसरली नाही व मोठा अनर्थ टळला.
या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून केवळ परिसरातील गवत व काही साहित्य जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. विजेच्या डीपीजवळील कोरडे गवत आणि वाढते तापमान यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता वाढत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
पत्रकार : सुमेश मुळे










