पुणे महानगरपालिकेचा हिंदुद्वेष की प्रशासकीय मनमानी? सावरकर जयंतीला परवानगी नाकारल्याने पुण्यात संतापाची लाट!
पुणे: एकीकडे शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांचे पेव फुटलेले असताना, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीला पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने परवानगी नाकारली आहे. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, महापालिकेचा हा निर्णय सावरकर प्रेमींचा अपमान करणारा असल्याची टीका होत आहे.
प्रशासनाचा आडमुठेपणा!
समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी २८ मे रोजी सारसबागेत जयंती उत्सवासाठी परवानगी मागितली होती. मात्र, ‘सावरकरांचा पुतळा बागेच्या बाहेर आहे’ आणि ‘उद्यानात जयंती साजरी करण्याचे धोरण नाही’ असे तकलादू कारण पुढे करत उद्यान विभागाने ही परवानगी नाकारली.
ज्वलंत सवाल: इतर कार्यक्रमांना परवानगी कशी?
सारसबागेत आणि शहरातील इतर उद्यानांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. मग केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याच बाबतीत महापालिकेला ‘धोरणांचे’ आठवण का येते? हा केवळ तांत्रिक मुद्दा आहे की सावरकरांच्या विचारांची प्रशासनाला भीती वाटते? असा जळजळीत सवाल आता उपस्थित केला जात आहे.
हिंदुत्वाचा अपमान खपवून घेणार नाही!
प्रशासनाने दिलेल्या या पत्रामुळे हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. ज्या क्रांतिकारकाने देशासाठी अंदमानचा काळापाणी सोसला, त्यांच्या जयंतीला त्यांच्याच देशात जागा मिळू नये, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. प्रशासनाचा हा सावरकरद्वेषी निर्णय तातडीने मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला जात आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे आता पुण्याचे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










