पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १८०० कोटींच्या ठेवींवरून ७ कोटींच्या नुकसानीचा ठपका; मुख्य वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्या बदलीची शिफारस .


 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका च्या तब्बल १८०० कोटी रुपयांच्या मुदत ठेवींच्या व्यवहारावरून मोठा वाद निर्माण झाला असून, चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे महापालिकेचे सुमारे ७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून, त्यांच्या बदलीची शिफारस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राज्य शासनाकडे केल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिकेकडे विविध विकासकामे, कर व निधी योजनांमधून जमा झालेला मोठा आर्थिक निधी मुदत ठेवी स्वरूपात बँकांमध्ये ठेवला जातो. या ठेवींवर अधिकाधिक व्याज मिळावे, यासाठी सामान्यतः विविध बँकांकडून दरपत्रके मागवून स्पर्धात्मक प्रक्रिया राबविली जाते. मात्र, या प्रकरणात ती प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८०० कोटी रुपयांच्या ठेवी ठेवताना राष्ट्रीयकृत बँकांना अपेक्षित प्राधान्य देण्यात आले नाही. तसेच अधिक व्याजदर मिळवण्यासाठी खुली स्पर्धा निर्माण करण्यात आली नसल्याने महापालिकेला मोठ्या आर्थिक फायद्यापासून वंचित राहावे लागले. याच कारणामुळे सुमारे ७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

या संपूर्ण व्यवहाराची अंतर्गत पातळीवर तपासणी करण्यात आल्यानंतर अनेक बाबी निदर्शनास आल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि नियमबद्धता अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

दरम्यान, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. प्रवीण जैन यांच्या बदलीची शिफारस राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याचे समोर आले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या घटनेमुळे महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांच्या कराच्या पैशांचा वापर अधिक जबाबदारीने आणि पारदर्शकपणे व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे.

प्रतिनिधी : शाम शिरसाठ पुणे


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!