‘त्या’ अपघातातील दुसऱ्या जखमीचाही मृत्यू; कमालपूरच्या युवकावर काळाचा घाला.


‘त्या’ अपघातातील दुसऱ्या जखमीचाही मृत्यू; कमालपूरच्या युवकावर काळाचा घाला.

टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील गायकवाड निंबोणी मळा परिसरात झालेल्या भीषण ट्रॅक्टर व दुचाकी अपघातातील आणखी एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रतीक अनिल गोरे (वय २२, रा. कमालपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. त्यामुळे या दुर्दैवी अपघातातील मृतांची संख्या आता दोन झाली आहे.

काही दिवसांपूर्वी वडाळा महादेव परिसरात ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक होऊन गंभीर अपघात झाला होता. अपघातानंतर ट्रॅक्टरखाली काही जण दबले गेल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून सर्वांना उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात हलविण्यात आले होते.

या अपघातात नाऊर येथील ट्रॅक्टर चालक रोहित अहिरे याचा जागीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. तर गंभीर जखमी झालेल्या प्रतीक गोरे याच्यावर पुढील उपचारासाठी प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचीही प्राणज्योत मालवली.

प्रतीक गोरे यांच्या निधनाची बातमी समजताच कमालपूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अल्पवयातच काळाने घाला घातल्याने गोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत असून, अपघाताच्या घटनेमुळे वडाळा महादेव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!