जळगावमध्ये पेट्रोल टंचाईमुळे नागरिक त्रस्त; वाढत्या दरांनी सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
जळगाव :जळगाव शहरासह जिल्ह्यात पेट्रोल टंचाईची समस्या गंभीर बनत असून नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी गॅस टंचाईचा सामना करावा लागल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत असून अनेक ठिकाणी पेट्रोल मर्यादित प्रमाणात दिले जात आहे. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक, वाहनचालक तसेच व्यापारी वर्ग अडचणीत सापडला आहे.
दरम्यान, पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पेट्रोलचे दर 104 रुपयांवरून तब्बल १०९ ते ११० रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सतत वाढणारी महागाई, इंधन टंचाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पत्रकार सुमेश मुळे








