सोलापुरात धावत्या एसटी बसची डिझेल टाकी निखळली; मोठा अनर्थ टळला, प्रवाशांची उडाली तारांबळ
सोलापूर जिल्ह्यातून एसटी प्रशासनाच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरच्या करमाळा डेपोची बस प्रवाशांना घेऊन विशिंबीकडे जात असताना सिद्धार्थनगर भागात बसची डिझेल टाकी अचानक रस्त्यावर पडली.
चालत्या बसमधून टाकी निखळल्याचा मोठा आवाज होताच चालकाने प्रसंगावधान राखून गाडी तातडीने थांबवली. त्यानंतर वाहकाच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. सुदैवाने, टाकी रस्त्यावर घासली जाऊन आग लागली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर चालकाने तातडीने करमाळा बस डेपोला संपर्क करून माहिती दिली. एसटी महामंडळाच्या बसची अशी दुरावस्था झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासन या घटनेची चौकशी करणार आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
९८२२५४८४२९







