दौंड तालुक्यात भरदुपारी गोळीबार; किरकोळ वादातून ३ ते ४ राऊंड फायर, परिसरात खळबळ
दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस (यवत) येथील गरदडे कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत आणि दगडफेकीत होऊन त्यानंतर ३ ते ४ राऊंड गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काही तरुणांचा स्थानिक तरुणांशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी वाद चिघळत जाऊन हाणामारी आणि दगडफेक झाली.
दरम्यान, संशयितांकडून ३ ते ४ राऊंड गोळीबार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबाराचा आवाज ऐकताच नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असून गोळीबारामागील नेमके कारण आणि संबंधित आरोपींचा सहभाग तपासला जात आहे.
या घटनेमुळे पाटस परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी










