नेर तहसीलमध्ये एकाच दिवशी चार तलाठ्यांचे निलंबन; जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई,


नेर तहसीलमध्ये एकाच दिवशी चार तलाठ्यांचे निलंबन; जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई:-

जि.यवतमाळ:(नेर):दि. 6 जून :-तालुक्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडवणारी कारवाई करत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी एकाच दिवशी चार तलाठ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. कर्तव्यात कसूर, विविध महसुली कामांमध्ये दिरंगाई आणि शासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यात झालेल्या हलगर्जीपणाच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या तलाठ्यांमध्ये भरत पिसे (पाथ्रड-गोळेगाव), एम. व्ही. अघमे (ब्राह्मणवाडा पश्चिम), भारती धांदे (पिंपळगाव डुबा) आणि पी. ए. चापसे (नेर) यांचा समावेश आहे.

कारवाईमागील प्रमुख कारणे

महसुली वसुली, गौण खनिज प्रकरणांवरील कारवाई, पांदण रस्ते मोहीम, ई-हक्क प्रणालीतील अर्ज निकाली काढणे तसेच प्रलंबित प्रकरणे वेळेत मार्गी न लावणे याबाबत संबंधित तलाठ्यांकडून गंभीर दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले.

याशिवाय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे वेळेत न करणे, पीक विमा योजनेशी संबंधित नोंदी अद्ययावत न ठेवणे, लँड सिलिंगची प्रकरणे तसेच जनगणना आणि निवडणुकीशी संबंधित कामे प्रलंबित ठेवणे, ही कारणेही कारवाईस कारणीभूत ठरली.

विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वेळेत न दिल्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

याबाबत तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी सांगितले की, “कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चार तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.”

दरम्यान, नेर तालुक्यात वाढत असलेल्या अवैध उत्खनन आणि गाळ चोरीच्या घटनांवरही प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. चार तलाठ्यांच्या निलंबनामुळे महसूल विभागाला स्पष्ट संदेश मिळाला असून नागरिकांची कामे वेळेत, पारदर्शक आणि जबाबदारीने पूर्ण करावीत, अन्यथा भविष्यात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

निलंबित तलाठ्यांच्या कार्यक्षेत्रात शासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी रिक्त पदांवर तातडीने नवीन तलाठ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे,          9359280220.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!