माणुसकीचा विजय! दिल्लीतील हॉटेलच्या भीषण आगीत गादी विक्रेते पिता-पुत्र बनले देवदूत; स्वतःचे नुकसान सोसून वाचवले ८ जणांचे प्राण


माणुसकीचा विजय! दिल्लीतील हॉटेलच्या भीषण आगीत गादी विक्रेते पिता-पुत्र बनले देवदूत; स्वतःचे नुकसान सोसून वाचवले ८ जणांचे प्राण

नवी दिल्ली:

दिल्लीतील मालवीय नगरमधील हौझ राणी भागात एका हॉटेलला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चोहोबाजूला धूर आणि नागरिकांचा आक्रोश पाहायला मिळाला. पाच मजली इमारतीला लागलेल्या या आगीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडायला मार्ग नसल्याने, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी थेट खिडक्यांमधून खाली उड्या मारण्यास सुरुवात केली.

या अत्यंत भीषण आणि भीतीदायक परिस्थितीत समोर गादीचे दुकान चालवणारे रियाजुद्दीन मन्सूरी आणि त्यांचा मुलगा अरमान हे तिथल्या लोकांसाठी देवदूत बनून धावून आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या दुकानातील सर्व गाद्या आणि रजाया काढून खाली रस्त्यावर पसरवल्या.

उंचावरून जीव वाचवण्यासाठी उड्या मारणाऱ्या लोकांसाठी या गाद्या एका सुरक्षा कवचासारख्या ठरल्या. सुमारे २ लाख रुपयांच्या मालाचे नुकसान होईल याची तसूभरही परवा न करता, या पिता-पुत्राने केवळ लोकांचे प्राण वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या या असीम धैर्यामुळे आणि प्रसंगावधानामुळे खिडकीतून उड्या मारणाऱ्या किमान ८ लोकांचे प्राण सुखरूप वाचले आहेत. या संकटसमयी त्यांनी दाखवलेल्या माणुसकीचे आणि शौर्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी ९८२२५४८४२९


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!