पुण्यात तोतया महिला पोलीस अधिकारी जेरबंद; पोलिसांची वर्दी घालून फिरणाऱ्या महिलेवर कारवाई
पुणे : पोलिसांचा गणवेश परिधान करून स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून वावरणाऱ्या एका महिलेवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. लष्कर पोलिसांनी ही कारवाई करत संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्प परिसरात पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) दर्जाच्या अधिकाऱ्याचा गणवेश घालून फिरणाऱ्या एका महिलेबाबत पोलिसांना संशय आला. त्यानंतर चौकशी करण्यात आली असता ती प्रत्यक्षात पोलीस दलातील कर्मचारी नसल्याचे उघड झाले.
पोलिसांनी तिची अधिक चौकशी केली असता तिच्याकडून पोलिसांच्या वर्दीचे दोन संच जप्त करण्यात आले. सरकारी गणवेशाचा गैरवापर करून नागरिकांची दिशाभूल केल्याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीत काही वैयक्तिक कारणांसाठी तिने पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान केल्याचे समोर आले आहे. मात्र, यापूर्वी तिने अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली आहे का किंवा इतर कोणत्या कारणासाठी वर्दीचा वापर केला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे पोलिसांच्या अधिकृत गणवेशाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
9822548429








