पुण्यात ‘टीटीएमएम’ संस्कृतीमुळे आयटी दांपत्याचा घटस्फोट
पुणे : पैशांच्या अति-हिशोबीपणामुळे आणि परस्परांवरील अविश्वासामुळे पुण्यातील एका उच्चशिक्षित आयटी दांपत्याचा संसार अखेर मोडीत निघाला आहे. ‘टीटीएमएम’ (तेरा तू, मेरा मेरा) अर्थात प्रत्येक खर्चाची निम्मी वाटणी करण्याच्या हट्टामुळे निर्माण झालेल्या वादातून हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयापर्यंत पोहोचले आणि अखेर न्यायालयाने परस्परसंमतीने घटस्फोटास मंजुरी दिली.
माहितीनुसार, संबंधित पती-पत्नी दोघेही आयटी क्षेत्रात कार्यरत असून २०२३ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. पतीचे उत्पन्न पत्नीपेक्षा अधिक असतानाही तो प्रत्येक खर्चाचा काटेकोर हिशोब ठेवत असे. घरगुती खर्च, हॉटेलमधील जेवण, फिरण्यासाठी जाणे तसेच इतर दैनंदिन खर्चांमध्ये पत्नीने निम्मा वाटा उचलावा, अशी त्याची भूमिका होती.
या सततच्या आर्थिक हिशोबामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले. त्यातच पत्नी माहेरी आर्थिक मदत करत असल्याच्या कारणावरून पती आक्षेप घेत असल्याचेही समोर आले. संशय आणि आर्थिक मतभेद यामुळे पती-पत्नीमधील दुरावा वाढत गेला.
गेल्या वर्षभरापासून हे दाम्पत्य वेगळे राहत होते. समुपदेशन आणि समेटाचे प्रयत्न होऊनही मतभेद मिटले नाहीत. अखेर दोघांनी परस्परसंमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटास मंजुरी दिली.
या प्रकरणामुळे आधुनिक वैवाहिक जीवनात आर्थिक व्यवहारांबाबत समजूतदारपणा, विश्वास आणि परस्पर सन्मान यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून शहरात या घटनेची चर्चा सुरू आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी








