भोकरदन नगरपरिषदेच्या सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करा; ‘आप’चे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
भोकरदन (प्रतिनिधी):
भोकरदन नगरपरिषदेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण व विषय समिती सभांचे थेट (लाईव्ह) प्रक्षेपण करण्यात यावे, तसेच सरकारी निधीतून सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी आवश्यक माहितीचे फलक लावण्यात यावेत, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे जिल्हा सचिव बोरशे गुरुजी यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती जालना जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आणि मुंबई नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या संचालकांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
’आप’च्या प्रमुख ४ मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
१. सभेचे लाईव्ह प्रसारण व ठराव सार्वजनिक करा:
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४ नुसार नगरपरिषदेच्या सभांचे लाईव्ह प्रसारण पालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज किंवा युट्यूब चॅनेलवर करावे. तसेच मंजूर झालेले ठराव ४८ तासांच्या आत पालिकेच्या वेबसाईटवर व नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करावेत. सध्या १५ वा वित्त आयोग, नगर विकास निधी, आमदार/खासदार निधीतून सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी फलक नसल्याने कामाची किंमत, कंत्राटदाराचे नाव व मुदत जनतेपासून लपवली जात आहे, तिथे तात्काळ माहिती फलक लावावेत.
२. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहीम राबवा:
पावसाळा तोंडावर असल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी २० जून २०२६ पूर्वी शहरातील सर्व लहान-मोठे नाले आणि गटारांची सफाई करावी. साचलेला गाळ व प्लास्टिक कचरा उचलून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी आणि प्रभागांमध्ये औषध फवारणी करावी.
३. केळणा नदीचे प्रदूषण थांबवा:
भोकरदनची जीवनवाहिनी असलेल्या केळणा नदीपात्रात कचरा, प्लास्टिक आणि सांडपाणी सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. नदीकाठी सूचना फलक लावून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार नदी प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलावीत.
४. पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करा:
शहरातील बिघडलेले हातपंप व सार्वजनिक नळ तात्काळ दुरुस्त करावेत. टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे आणि नवीन कूपनलिकांचा प्रस्ताव मंजूर करावा. पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
उपोणाचा इशारा:
“येत्या २० जून २०२६ पर्यंत या सर्व मागण्यांवर नगरपरिषदेने लेखी कृती अहवाल देऊन केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी, अन्यथा जनहितार्थ उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव बोरशे गुरुजी, अनिल पगारे, महजाद खान, इब्राहिम कुरेशी, फारुख शेख, नारायण सोन्नी, नईम भाई, अमजद भाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
.
पत्रकार महेंद्र बेराड










