पुणे पदवीधर निवडणूक : डॉ. मिलिंद संपगावकर यांची ब्राह्मण महासंघ आणि हिंदू महासभा कार्यालयाला सदिच्छा भेट; मतदार नोंदणीचे आवाहन
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक हालचालींना वेग आला आहे. काल, मंगळवार दिनांक ९ जून २०२६ रोजी पुणे पदवीधर मतदारसंघाचे भावी उमेदवार डॉ. मिलिंद संपगावकर आणि पुणे पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी प्रमुख, उद्योजक श्री. अतुलजी लाहोटी यांनी ब्राह्मण महासंघ व हिंदू महासभा यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार नोंदणीपासून ते थेट निवडून येण्याच्या निकषांपर्यंत सर्वच विषयांवर अत्यंत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. डॉ. संपगावकर यांनी यावेळी ब्राह्मण महासंघ आणि हिंदू महासभा या दोन्ही संघटनांना निवडणूक प्रक्रियेत आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत, पदवीधरांची मतदार नोंदणी जास्तीत जास्त कशी वाढवता येईल आणि झालेली नोंदणी प्रत्यक्ष मतदानात कशी परिवर्तित करता येईल, यावर सखोल चर्चा करून पुढील रणनीती व नियोजन आखण्यात आले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला हिंदू महासभा आणि ब्राह्मण महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे, प्रदेश संपर्कप्रमुख नितीन शुक्ल, प्रदेश समन्वयक उमेश कुलकर्णी, प्रदेश पदाधिकारी संजय देशमुख, महिला प्रदेश समन्वयक अदिती जोशी, प्रदेश पदाधिकारी अनिता जोशी आणि प्रदेश पदाधिकारी विद्या घटवाई यांचा समावेश होता.
यावर्षी पुणे पदवीधर निवडणूक २०२६ मध्ये एका सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातील आणि उच्चशिक्षित उमेदवाराला विधान परिषदेत पाठवण्याचा निर्धार पुण्यातील विविध संघटना करत आहेत. याच अनुषंगाने डॉ. मिलिंद संपगावकर यांनी वेगवेगळ्या सामाजिक व व्यावसायिक संघटनांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्याचा धडाका सुरू केला आहे. यावेळचा पदवीधरांचा आमदार हा स्वच्छ प्रतिमेचा, सुशिक्षित आणि पदवीधरांच्या खऱ्या अडचणींची जाण असणाराच असावा, असे मत सर्वसामान्य मतदारांमधून व्यक्त होत आहे. पुण्यातील अनेक पदवीधरांच्या आग्रहास्तव डॉ. संपगावकर यांनी ही निवडणूक तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीकरिता जास्तीत जास्त पदवीधरांनी पुढे यावे, असे आवाहन डॉ. संपगावकर आणि त्यांच्या टीमने केले आहे. नोंदणीसाठी पदवीधरांनी WWW.drmilindsampgaonkar.com या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करून आपली मतदार नोंदणी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
.प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429










