फसव्या कर्जमाफी योजनेच्या निषेधार्थ श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय आंदोलन:-


फसव्या कर्जमाफी योजनेच्या निषेधार्थ श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय आंदोलन:-

श्रीगोंदा :दि. 9 जून :-राज्य शासनाने जाहीर केलेल्या नव्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी आणि शेतकऱ्यांची होत असलेली कथित फसवणूक याविरोधात श्रीगोंदा येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. लोकनेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नव्या कर्जमाफी योजनेमुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

यावेळी नंदकुमार ताडे , अनिल ठवलं , प्रशांत दरेकर , अरविंद कापसे , भापकर गुरुजी आणि हेमंत नलगे यांनी मनोगत व्यक्त करत शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.

आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या कर्जमाफी संदर्भातील निर्णयावर टीका करत, ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना विविध अटींच्या जाळ्यात अडकवणारी असल्याचा आरोप केला. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही भेदभावाशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

विविध वक्त्यांनी आपल्या भाषणातून सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण होत नसल्याची भावना व्यक्त करत त्यांनी शासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.

आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले.

शेतकरी हिताच्या मागण्यांवर शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!