मुंबईची पहिली ‘कार फ्री फ्रायडे’ मोहीम बीकेसीत १२ जूनपासून
मुंबई — वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने दर शुक्रवारी ‘नो कार’ उपक्रम राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम १२ जूनपासून अधिकृतरित्या सुरू होईल आणि तो देशातील पहिल्या ‘कार फ्री फ्रायडे’ मोहिमेचा भाग आहे.
या उपक्रमाअंतर्गत १२ जूनपासून प्रत्येक शुक्रवार बीकेसीतील कर्मचाऱ्यांसाठी ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट डे’ म्हणून पाळला जाणार आहे. प्रशासनाने परिसरात रोज येणाऱ्या मोठ्या संख्येने खाजगी वाहनांमुळे निर्माण होणारी कोंडी आणि प्रदूषण लक्षात घेऊन सुमारे २ लाख कर्मचाऱ्यांना शुक्रवारी खाजगी कारच्या ऐवजी लोकपरिवहन — ट्रेन, मेट्रो, बस इत्यादींचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
प्रारंभिक टप्प्यात हा उपक्रम तीन ते चार महिने पायलट स्वरूपात पाळला जाईल. या कालावधीत प्रशासन उपक्रमाच्या प्रभावीतेचे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतिसादाचे बारकाईने मूल्यमापन करेल. त्यानंतर पुढील उपाययोजना ठरविण्यात येतील.
बीकेसीमध्ये काम करणाऱ्यांपैकी बर्याच जणांचा प्रवास अद्याप खाजगी कार, टॅक्सी व रिक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांना कोणत्या सुविधांचा लाभ मिळेल, वाहतूक व्यवस्थेत किती फरक पडेल आणि लोकांचा सहभाग कितपत असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा प्रयोग प्रदूषण कमी करण्यासाठी आणि वाहतुकीचे नियमबद्ध व्यवस्थापन करून शहरात प्रवाह सुधारण्यासाठी महत्त्वाचा पडणार आहे. जर पायलट टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाला तर हा मॉडेल इतर व्यावसायिक केंद्रांमध्येही लागू करण्यावर विचार केला जाईल.
पत्रकार: उमेश कुलकर्णी
संपर्क: 9822548129







