भिवंडीत ‘FDA’चे तोतया अधिकारी बनून खंडणी उकळणारी महिला गजाआड; ३ साथीदार फरार


भिवंडीत ‘FDA’चे तोतया अधिकारी बनून खंडणी उकळणारी महिला गजाआड; ३ साथीदार फरार

भिवंडी :अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धाकाचा गैरफायदा घेत व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या तोतया अधिकाऱ्यांच्या टोळीचा भिवंडीत पर्दाफाश झाला आहे. शांतीनगर परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना लक्ष्य करणाऱ्या या टोळीतील शांताबाई राजपूत या महिलेला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले असून तिचे तीन साथीदार फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःला FDA अधिकारी असल्याचे भासवून हॉटेल चालक व व्यापाऱ्यांवर कारवाईची भीती दाखवत पैशांची मागणी करत होते. काही नागरिकांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शांताबाई राजपूत हिला ताब्यात घेतले.
या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपी महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, फरार असलेल्या अन्य तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
या घटनेमुळे व्यापारी व व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून कोणतीही व्यक्ती अधिकारी म्हणून कारवाईसाठी आल्यास त्यांची ओळख व अधिकृत कागदपत्रांची खातरजमा करण्याचे आवाहन प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पत्रकार : उमेश कुलकर्णी
मो. 9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!