NEET UG पुनर्परीक्षेसाठी NTA चे विद्यार्थीहिताचे निर्णय; परीक्षेला १५ मिनिटांची वाढ, रफ वर्कसाठी ४ पाने
नवी दिल्ली :
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने २१ जून रोजी होणाऱ्या NEET (UG)-2026 पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी काही महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. परीक्षेच्या कालावधीत १५ मिनिटांची वाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता एकूण १९५ मिनिटांचा कालावधी उपलब्ध होणार आहे.
NTA च्या नव्या सूचनेनुसार परीक्षा दुपारी २:०० ते सायंकाळी ५:१५ या वेळेत होणार आहे. वाढीव वेळेमध्ये हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करणे, ओळख पडताळणी आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी पूर्ण वेळ मिळणार आहे.
याशिवाय, प्रश्नपत्रिकेमध्ये रफ वर्कसाठी उपलब्ध जागाही वाढविण्यात आली आहे. पूर्वीच्या २ पानांऐवजी आता विद्यार्थ्यांना ४ पाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामुळे गणिती आकडेमोड, आकृत्या किंवा इतर कच्च्या कामासाठी अधिक जागा मिळणार आहे.
NTA ने दिलेल्या माहितीनुसार दोन रफ पाने सूचनांच्या पानानंतर तर उर्वरित दोन पाने प्रश्नपत्रिकेच्या शेवटी देण्यात येणार आहेत. हा बदल इंग्रजी तसेच सर्व प्रादेशिक भाषांतील प्रश्नपत्रिकांसाठी लागू असेल.
स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी आणि परीक्षेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आल्याचे NTA ने स्पष्ट केले आहे. या निर्णयाचे विद्यार्थी आणि पालकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
— पत्रकार उमेश कुलकर्णी
मो. 9822548429










