रुग्णांना औषध खरेदीचे स्वातंत्र्य; हॉस्पिटलमधूनच औषधे घेण्याची सक्ती करता येणार नाही
पुणे :रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना ठराविक मेडिकल स्टोअरमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडता येणार नाही, असे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) स्पष्ट केले आहे. रुग्णांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही परवानाधारक औषध दुकानातून औषधे खरेदी करण्याचा अधिकार आहे.
एफडीएच्या निर्देशांनुसार, रुग्णालये आणि त्यांच्या आवारातील औषध विक्री केंद्रांनी “येथे औषध खरेदी करण्याची कोणतीही सक्ती नाही” असा फलक दर्शनी भागात लावणे अपेक्षित आहे. यामागील उद्देश रुग्णांना त्यांच्या अधिकारांची माहिती देणे आणि औषध खरेदीसंदर्भातील संभाव्य गैरप्रकारांना आळा घालणे हा आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, बाहेरील परवानाधारक मेडिकलमधून खरेदी केलेली औषधे स्वीकारण्यास रुग्णालयांनी नकार देऊ नये. तसेच रुग्णांवर विशिष्ट दुकानातूनच औषधे घेण्यासाठी दबाव आणल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते.
आरोग्य क्षेत्रात पारदर्शकता वाढविणे आणि रुग्णांची आर्थिक पिळवणूक रोखणे या उद्देशाने हे नियम महत्त्वाचे मानले जात आहेत. त्यामुळे रुग्णांना परवडणारी किंवा जेनेरिक औषधे निवडण्याचा पर्याय उपलब्ध राहणार असून उपचारांचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
982254829










