श्री क्षेत्र भीमाशंकर’च्या सर्वांगीण विकासाला देवाभाऊंची गती; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली विकास आराखड्याची पाहणी.


‘श्री क्षेत्र भीमाशंकर’च्या सर्वांगीण विकासाला देवाभाऊंची गती; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली विकास आराखड्याची पाहणी

भीमाशंकर (प्रतिनिधी): भगवान महादेवांच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पवित्र श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला राज्य सरकारने गती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देऊन मंदिर परिसर विकास आराखडा व प्रस्तावित भीमाशंकर कॉरिडोरची पाहणी केली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रींची विधीवत पूजा केली तसेच ‘भीमाशंकर हेरिटेज व्हिलेज’च्या विकास आराखड्याचा आढावा घेतला. मंदिर परिसर विकास, भाविकांसाठी आधुनिक सुविधा, वाहतूक व्यवस्थेचे सुदृढीकरण, स्वच्छता व पायाभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे-पाटील आणि आमदार बाबाजी काळे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना भीमाशंकरचा मूळ आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारसा जपत भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे सांगितले.

प्रस्तावित विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी सुविधा केंद्रे, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, स्वच्छता व्यवस्था बळकट करणे तसेच स्थानिक संस्कृती आणि वारसा जतन करणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे. आगामी काळात “वारसा जपत विकास” या संकल्पनेतून श्री क्षेत्र भीमाशंकरला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

राज्यातील भाजपा महायुती सरकारच्या पुढाकारातून श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही विकासकामे पूर्ण करण्याचा संकल्प शासनाने केला आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे,


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!