चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिर परिसरात ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री?; देवस्थान ट्रस्टची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
पिंपरी-चिंचवड :
चिंचवड देवस्थान ट्रस्टने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे गंभीर तक्रार दाखल केली आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर परिसरात भाविकांच्या मोठ्या गर्दीचा फायदा घेत काही विक्रेत्यांकडून सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री होत असल्याचा आरोप ट्रस्टने केला आहे.
ट्रस्टच्या पत्रानुसार, मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः चतुर्थीच्या दिवशी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. याच गर्दीचा फायदा घेत मुंब्रा, कळवा आणि इतर भागांतून येणारे काही विक्रेते कोणतीही अधिकृत परवानगी न घेता मंदिरासमोरील रस्त्यावर दुकाने थाटत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून भाविकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
देवस्थान ट्रस्टने यापूर्वीही महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्याचे सांगितले आहे. मात्र, ठोस कारवाई न झाल्याने अशा विक्रेत्यांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, ३ जून २०२६ रोजी झालेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही विक्रेत्यांकडे ‘मेड इन पाकिस्तान’ असा उल्लेख असलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तसेच भाविकांच्या भावना आणि श्रद्धेशी संबंधित असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ट्रस्टने केली आहे.
या संदर्भातील तक्रार अर्ज पोलीस आयुक्त कार्यालयाने स्वीकारला असून आता प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून कोणती भूमिका घेते याकडे भाविक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
– पत्रकार उमेश कुलकर्णी
मो. 9822548429










