महापालिका भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि शिक्षण विभागात असणारा भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वेळोवेळी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या या प्रशासनाला जागे करण्यासाठी गुरुवारी जागर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना चेतन पवार यांनी सांगितले की, पुनावळे येथील मनपा शाळेसाठी आरक्षित भूखंड खाजगी संस्थेला देऊ नये. तिथे गोरगरिबांच्या मुलांसाठी मनपाने शाळा सुरू करावी. या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा आयुक्तांना पत्र देऊन, पत्रकार परिषद घेऊन देखील विरोध दर्शविण्यात आला होता. तरी देखील सोमवारी सर्वसाधारण सभेत तुटपुंज्या रकमेवर ९१ गुंठ्यांचा हा आरक्षित भूखंड ३० वर्षाच्या मुदतीवर नाममात्र भाडेकराराने देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. याला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून सभागृहात विरोध करायला हवा होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपची बी टीम असल्याने त्यांनी विरोध केला नाही आणि बहुमताच्या जोरावर या प्रशासनाने ठराव मंजूर केला. यासाठी कोणत्या आमदारांचा, वरिष्ठांचा दबाव होता हे आयुक्तांनी जाहीर करावे आणि या मनपा हद्दीतील उर्वरित सर्व भूखंड देखील मोठ्या कारभाऱ्यांना आणि त्यांच्या संस्थेला देण्यासाठी आरक्षित भूखंड भाड्याने देण्याचे दुकान उघडल्याचा फलक मनपा भवनावर लावावा असे चेतन पवार यांनी सांगितले
ताथवडे येथे (सर्वे नंबर ६४/२/१) “ड” प्रभाग कडून खासगी कन्सल्टंट चा अभिप्राय घेऊन नाला शिफ्ट करण्यात आला. तेथे नाला वळविण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. येथील नागरिकांना त्रास देऊन हे सर्व बिल्डरच्या फायद्यासाठी केले आहे. या प्रकल्पाचा बांधकाम परवाना ताबडतोब रद्द करावा अशी मागणी येथील नागरिकांची आहे. या जागर मोर्चा पारंपरिक वाद्यांचा गजर करीत पोतराजाचा वेष परिधान करून प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या मोर्चामध्ये माजी आमदार गौतम चाबुकस्वार,अशोक वाळके, कैलास नेवासकर, सोमी सिंधू, दिलीप सावंत,योगेश ठाकरे सर्व निष्ठावंत शिवसैनिक महिला पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार विजय अडसूळ





