चोरीच्या वाहनांच्या संशयावरून दोन भंगार दुकानदार अटकेत
श्रीरामपुरात पोलिसांची कारवाई; वाहनांचे कागदपत्रे नसल्याचे तपासात निष्पन्न
टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर शहर व परिसरात चोरीच्या वाहनांची भंगार दुकानांमध्ये बेकायदेशीर विक्री होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. या कारवाईत दोन भंगार दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलिसांनी दि. ११ रोजी ऑल आऊट ऑपरेशन व कोंबिंग ऑपरेशन राबविले. यावेळी शहरातील विविध भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. तीन भंगार दुकानांमध्ये विविध वाहने आढळून आली. संबंधितांकडे वाहनांच्या कागदपत्रांची मागणी केली
असता, शकील इब्राहीम शहा आणि सुलेमान दादामिया शहा यांनी समाधानकारक खुलासा अथवा वाहनांच्या मालकीचा पुरावा सादर केला नाही.
तपासात संबंधित वाहनांच्या मालकीबाबत कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचे तसेच ही वाहने चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. उपप्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी न घेता वाहन तोडणे, चेसी व इंजिन क्रमांक जमा न करणे आणि शासनाचा कर न भरता नियमांचा भंग केल्याप्रकरणी शकील शहा व सुलेमान शहा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, ३१८ (४) व ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई मा.श्री. मुम्मका सुदर्शन साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, जयदत्त भवर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, विशाल खैरे, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, सहा फौ/ राजु त्रिभुवन, पोहेकाँ दादासाहेब लोढे, पोना/विशाल खंडागळे, पोकाँ धनंजय वाघमारे, पोकाँ/ सागर बनसोडे, पोकाँ/अमोल गायकवाड,, यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक विशाल खैरे साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम हे करीत आहेत.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर







