ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत; शिरूर नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम:-
जि. पुणे, ता. शिरूर:दि. 18 जून :-नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शिरूर नगरपरिषद शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात संस्मरणीय व्हावी आणि शिक्षणाबद्दल आकर्षण निर्माण व्हावे या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या स्वागत सोहळ्यात शिरूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती मितेश गादिया यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. फुलांनी आणि फुग्यांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले. या अनोख्या स्वागतामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह झळकत होता.
यावेळी नगराध्यक्ष ऐश्वर्याताई पाचर्णे, नगरसेवक, नगरसेविका, शिक्षक, कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आत्मीयता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून आनंदी वातावरणात शिक्षणाची सुरुवात व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही ट्रॅक्टरमधून शाळेत प्रवेश करताना उत्साहाने सहभाग घेतला.
शिरूर नगरपरिषदेच्या या उपक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक संदेश गेला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची गरज असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.





