​ऑनलाईन गेमिंगच्या नादापायी उच्चशिक्षित तरुण बनला सायबर चोर; पुणे लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई


​ऑनलाईन गेमिंगच्या नादापायी उच्चशिक्षित तरुण बनला सायबर चोर; पुणे लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई

​पुणे:ऑनलाईन गेम खेळण्याच्या व्यसनापायी आणि पैशांची गरज भागवण्यासाठी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे सिमकार्ड चोरून त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारणाऱ्या एका २३ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाला पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. संकेत सतीश कुलकर्णी (वय २३, रा. आकुर्डी, पुणे) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत.
​घटना काय होती?
​सांगली येथील रहिवासी विनोद सदाशिव रेणके (वय ४७) हे २२ जानेवारी २०२६ रोजी पुणे रेल्वे स्टेशन येथील स्लीपर वेटिंग रूममध्ये आपला मोबाईल चार्जिंगला लावून बसले होते. काही वेळाने त्यांनी पाहिले असता त्यांच्या मोबाईलमधील सिमकार्ड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याच नंबरचे दुसरे सिमकार्ड काढून जेव्हा नवीन मोबाईलमध्ये टाकले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या नावाने ऑनलाईन कर्ज काढून फ्लिपकार्टवरून १,१३,००० रुपयांचे मोबाईल खरेदी करण्यात आले होते, तसेच बँक खात्यातून ४,५०० रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाले होते. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​अशी होती गुन्ह्याची पद्धत (Modus Operandi)
​आरोपी संकेत कुलकर्णी हा रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलमधून केवळ सिमकार्ड चोरायचा. ते सिमकार्ड स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकून तो पीडित व्यक्तीचे जीमेल अकाऊंट चालू करायचा. जीमेल लॉगिन झाल्यानंतर गुगल फोटोज (Google Photos) मधून पीडितांचे आधारकार्ड किंवा डेबिट कार्डचे फोटो शोधून काढायचा. या कागदपत्रांच्या आधारे तो फोन पे (PhonePe) किंवा पेटीएम (PayTM) चा पिन बदलून बँक खात्यातील पैसे उडवायचा, त्यांच्या नावे कर्ज काढायचा किंवा ऑनलाईन शॉपिंग करायचा. त्याने अशाच प्रकारे आणखी ३ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
​पोलिसांचा सलग ११ दिवस पाठलाग
​गुन्हा घडला त्या दिवशी वेटिंग रूममधील सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांना सुरुवातीला कोणताही सुगावा लागला नाही. आरोपी सतत सिमकार्ड बदलत असल्याने तांत्रिक तपासातही अडथळे येत होते. दरम्यान, २९ मे २०२६ रोजी पुन्हा तशाच प्रकारची घटना स्लीपर वेटिंग रूम नंबर २ मध्ये घडली. यावेळी पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्मवरील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताचा फोटो मिळवला.
​आरोपी पुन्हा चोऱ्या करण्यासाठी येईल या अंदाजाने पोलिसांनी गुप्त बातमीदार आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून सलग ११ दिवस त्याचा मागोवा घेतला. अखेर ९ जून २०२६ रोजी पुणे लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ (RPF) च्या पथकाने संयुक्त सापळा रचून आरोपीला आकुर्डी येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीची पोलीस कस्टडी संपल्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
​सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन
​या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी खालील महत्त्वाच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे:
​आपल्या मोबाईलमधील फोन पे, पेटीएम किंवा इतर पेमेंट गेटवे ॲप्स सुरक्षित ठेवण्यासाठी फिंगरप्रिंट किंवा पिन लॉकचा वापर करावा.
​गुगल फोटोज (Google Photos) मधील वैयक्तिक फोटो आणि महत्त्वाची कागदपत्रे इतरांना दिसू नयेत यासाठी गॅलरी/फोटोज ॲपला लॉक लावावे.
​मोबाईल चोरीला गेल्यास किंवा सिमकार्ड गहाळ झाल्यास त्याचा गैरवापर टाळण्यासाठी मोबाईलमध्ये ‘सिमकार्ड लॉक’ (SIM Lock) चा पर्याय नक्की वापरावा.
​कामगिरी करणारे पथक:
सदर धडक कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, उपनिरीक्षक शंभु रणवरे, , पोलीस हवालदार अमरदीप साळुंखे, धीरज भोसले, पोलीस अंमलदार अतुल कांबळे तसेच आरपीएफचे एसआय दादासो लाड, एसआय विशाल मोरे आणि आरक्षक युवराज गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी

9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!