शिवरायांच्या जिरेटोपावरील झेंडा प्रकरण; जैन समाजाची माफी, राज ठाकरेंचा इशारा
मुंबई: मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी शिष्टमंडळाने राज ठाकरे यांच्याकडे लेखी माफीनामा सादर करत संपूर्ण घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला महाराष्ट्राची अस्मिता, छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आणि सार्वजनिक ठिकाणी ऐतिहासिक प्रतीकांबाबत संवेदनशीलता राखण्याबाबत कडक समज दिली. भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही, अशी ग्वाही जैन समाजाच्या प्रतिनिधींनी यावेळी दिल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणानंतर सामाजिक आणि राजकीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटल्या असून, लेखी माफीनाम्यानंतर हा वाद निवळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






