महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय :-
मुंबई:दी. 28 जून:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) भरती प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि कालबद्ध करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणकाधारित कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भीमनवार म्हणाले की, सीबीटी पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि विश्वासार्ह होईल. तसेच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना वेळेत न्याय मिळेल.
भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा करण्यात येत असून, पूर्व परीक्षांचे निकाल २१ दिवसांत जाहीर करण्याचे आयोगाचे नियोजन आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अवघ्या २२ दिवसांत जाहीर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढे ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षात संबंधित भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आयोगाचे लक्ष्य आहे. मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया ९ ते ११ महिन्यांत, तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची भरती प्रक्रिया ६ ते ७ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सीबीटी पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू राहणार असून, राज्यसेवा तसेच गट ‘अ’, गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही भीमनवार यांनी स्पष्ट केले.
लोकसेवा आयोगाने आतापर्यंत सुमारे १४० परीक्षा सीबीटी प्रणालीद्वारे यशस्वीपणे घेतल्या असून, ही प्रणाली वैज्ञानिक, न्यायालयमान्य आणि देशभरात स्वीकारली गेलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर आणि परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर-देशमुख उपस्थित होते.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.







