वर्धनगड किल्ल्यावरून १० टनाचा महाकाय दगड बौद्ध वस्तीपाशी कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली :-


वर्धनगड किल्ल्यावरून १० टनाचा महाकाय दगड बौद्ध वस्तीपाशी कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली :-

जि. सातारा, ता.वर्धनगड:दी. 29 जून :-काल रात्री दोन ते अडीचच्या सुमारास ऐतिहासिक वर्धनगड किल्ल्याच्या तटबंदीच्या खालच्या बाजूचा तब्बल १० टनाहून अधिक वजनाचा एक महाकाय दगड अचानक सुटून खाली असलेल्या बौद्ध वस्तीच्या दिशेने वेगाने आला. हा दगड कोसळतानाचा गडगडण्याचा आवाज एवढा भयानक आणि थरारक होता की, या आवाजाने वस्तीतील सर्व लोक घाबरून जागे झाले. मात्र, रात्री गाढ अंधार असल्याने नेमके काय घडले आहे हे कोणालाच समजले नाही.

सकाळी उजाडल्यानंतर जेव्हा लोकांनी पाहिले, तेव्हा हा सुमारे १० टनाचा महाकाय दगड वस्तीतील दोन घरांच्या अगदी मध्यभागी येऊन थांबल्याचे दिसून आले. “काळ आला होता पण वेळ आली नव्हती” या उक्तीनुसार हा दगड घरांवर न आदळता मध्येच थांबल्याने दोन्ही घरे आणि त्यातील नागरिक बालंबाल वाचले. हा दगड जर थेट घरांवर गेला असता, तर क्षणार्धात घरांचा चुराडा होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असती. या भयावह दृश्यामुळे सध्या वस्तीतील नागरिकांनी मोठी धास्ती घेतली आहे.

किल्ल्याच्या ऐतिहासिक तटबंदीला मोठ्या प्रमाणावर झाडाझुडपांनी व्यापले असून, यामुळे तटबंदी दिवसेंदिवस ढिसाळ व कमकुवत होत चालली आहे. या ढिसाळ झालेल्या तटबंदीमुळेच असे महाकाय दगड सुटत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन करणे गरजेचे असताना वनविभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यापूर्वीही तटबंदीवरील झाडेझुडपे काढण्यासंदर्भात अनेकदा वृत्तपत्रांमधून मागण्या करण्यात आल्या होत्या, मात्र वनविभागाने आजतागायत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

हा महाकाय दगड खाली आल्यानंतर, बौद्ध वस्तीत राहणारे आरपीआयचे अध्यक्ष प्रशांत शिवशरण यांनी तातडीने फोन करून वनविभागाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे वनपाल काशीद आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सदरचा मोठा दगड आणि येथील धोक्याच्या परिस्थिती संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती वनपाल काशीद यांनी दिली आहे.

सध्या हवामान आणि वातावरणात अत्यंत वेगाने आणि विचित्र पद्धतीने बदल होत आहेत. कधी तीव्र ऊन, कधी अवकाळी पाऊस, तर कधी अचानक वादळ-वारा व मुसळधार पाऊस पडत आहे. अशा बदलत्या वातावरणामुळे व ढगफुटीसारख्या घटनांमुळे पुढील काळात किल्ल्याच्या परिसरातील इतर महाकाय दगडही अचानक सुटून खाली येण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या धोकादायक पत्थरांची त्वरित विल्हेवाट लावावी आणि ऐतिहासिक तटबंदीचे जतन करण्यासाठी त्यावरील झाडेझुडपे तात्काळ काढावीत, अशी मागणी आता वर्धनगड परिसरातील ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!