पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प; ठाकूरवाडीजवळ दरड कोसळल्याने १४ एक्सप्रेस गाड्या रद्द


पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प; ठाकूरवाडीजवळ दरड कोसळल्याने १४ एक्सप्रेस गाड्या रद्द

मुंबई / कर्जत : कर्जत-खंडाळा घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ठाकूरवाडी आणि खंडाळा-मंकी हिल दरम्यान रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून मुंबई-पुणे तसेच मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
दरड कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि पाण्याचा प्रवाह रेल्वे रुळांवर आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाने तातडीने वाहतूक थांबवली. या घटनेमुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईहून सुटणाऱ्या एकूण १४ एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे सेवा ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला असून अनेकांना स्थानकांवरच थांबावे लागत आहे. दरड हटविण्यासाठी रेल्वेचे अभियंते, तांत्रिक कर्मचारी आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. परिस्थितीवर मध्य रेल्वे प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून रुळांची सुरक्षितता तपासल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, घाट परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी आणि प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
982254842


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!