नालासोपारा मुसळधार पावसाने जलमय; सखल भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत
नालासोपारा : मुसळधार पावसामुळे नालासोपारा शहरात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि निवासी परिसर जलमय झाले आहेत.
रस्त्यांवर कंबरभर पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक ठप्प झाली असून अनेक वाहनचालकांना रस्त्यातच वाहने सोडून द्यावी लागली. नागरिकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत असून अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.
सोशल मीडियावर नालासोपाऱ्यातील पूरस्थितीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून शहरातील गंभीर परिस्थिती समोर येत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पालिका प्रशासनाने पाणी उपसण्यासाठी पंप, कर्मचारी आणि आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली असली, तरी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निचऱ्याच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






