इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ; खबरदारी म्हणून आळंदीतील सर्व पूल तात्पुरते बंद
संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवरील सर्व पूल तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी या संदर्भातील अधिकृत सार्वजनिक सूचना जारी केली आहे.
आळंदीमध्ये सध्या दर्शनासाठी येणारे भाविक, वारकरी आणि स्थानिक नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने हा खबरदारीचा निर्णय घेतला आहे. नदीला आलेला पूर आणि पाण्याचा वाढता वेग पाहता, कोणीही इंद्रायणी नदीपात्राकडे अथवा नदीकाठी जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बंद करण्यात आलेल्या पुलांवरून किंवा प्रतिबंधित भागातून प्रवास न करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्याची पूरस्थिती लक्षात घेता सर्व नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत सूचनांचेच पालन करावे, असे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






