राजस्थान हादरले! १३ वर्षांच्या मुलीवर ५ दिवस अत्याचार करणाऱ्या सर्व आरोपींना अटक; ३ हॉटेल्सवर चालला बुलडोझर
जयपूर/श्रीगंगानगर:
राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सलग पाच दिवस सामूहिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मोठी कारवाई करत पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यात सामील असलेल्या ३ हॉटेल्सवर प्रशासनाने थेट बुलडोझर चालवून त्या जमीनदोस्त केल्या आहेत.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, एका रिक्षाचालकाने या पीडित मुलीचे तिच्या घरातून अपहरण केले होते. त्यानंतर त्याने या मुलीला शहरातील हॉटेल चालकांना विकले. आरोपींनी तिला वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये नेऊन १८ जून ते २३ जून दरम्यान सलग ५ दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
या घृणास्पद प्रकारात एकूण ३२ संशयित आणि आरोपींची नावे समोर आली होती. पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ‘हॉटेल जॉय इन’वर छापा टाकून या पीडित मुलीची सुरक्षित सुटका केली. सोशल मीडिया आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्र फिरवत या प्रकरणातील सर्व मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये हॉटेल मालक आणि मॅनेजरचाही समावेश आहे.
हॉटेल्सवर चालला बुलडोझर
या घटनेमुळे संपूर्ण राजस्थानमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती. आरोपींवर कडक कारवाईच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. जनतेचा आक्रोश पाहता जिल्हा प्रशासनाने आणि पोलिसांनी गुन्हेगारांना कडक संदेश देण्यासाठी मोठा बडगा उगारला. ज्या हॉटेल्समध्ये हा काळा कृत्य घडले, त्या ‘हॉटेल खुंगर’, ‘हॉटेल जॉय इन’ आणि ‘हॉटेल सॅफायर’ या तिन्ही हॉटेल्सवर प्रशासनाने बुलडोझर चालवून त्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत.
पोलिसांचे सोशल मीडियावरील अफवांवर स्पष्टीकरण
या घटनेदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक मुलगी हॉस्पिटलमध्ये रडताना पोलिसांवर आरोप करत होती. मात्र, राजस्थान पोलिसांनी अधिकृत स्पष्टीकरण देत हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील हरदोई येथील वेगळ्या प्रकरणाचा असल्याचे सांगितले आहे. या श्रीगंगानगर प्रकरणातील पीडित मुलगी सुरक्षित असून तिच्यावर सध्या वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन सुरू आहे. नागरिकांमधून या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात (Fast Track Court) चालवून नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429




