पावसात महाराष्ट्र ‘पॅरालिसिस’; सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प परिसरात झालेल्या दरडीच्या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबई–पुण्याला पाऊस नवा नाही, मात्र यंदा एका पावसात संपूर्ण महाराष्ट्र ‘पॅरालिसिस’ झाल्याचे चित्र दिसत असल्याचे त्यांनी म्हटले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ची झालेली दुरवस्था अत्यंत चिंताजनक आहे. राज्यभर मुसळधार पावसामुळे रस्ते, वाहतूक आणि जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले असून, यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा आणि आवश्यक असल्यास राज्यात आणीबाणी जाहीर करून परिस्थिती हाताळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून, प्रशासनाकडून परिस्थिती सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






