ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
देहू (पुणे) : “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम” आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पालखी सोहळ्याचे श्रीक्षेत्र देहूगाव येथून पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान झाले. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण देहूनगरी विठ्ठलमय झाली होती.
पालखी प्रस्थानापूर्वी मुख्य मंदिरात मानाच्या पादुकांची पारंपरिक पूजा, महाआरती आणि धार्मिक विधी पार पडले. आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांनी विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. प्रशासनाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था केली असून पालखीचा पुढील प्रवास नियोजित मार्गाने सुरू झाला आहे.
आज (८ जुलै) संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आकुर्डी (पिंपरी-चिंचवड) येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात आहे. पालखीच्या स्वागतासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून, विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन आणि हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या पालखी पुण्यातील नाना पेठ येथील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान करणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






