निवडणुकांच्या कामांचा फटका शालेय विद्यार्थ्यांना; शासनाचा मुलांच्या आरोग्याशी आणि शिक्षणाशी खेळ सुरू?
पुणे: लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये, या हेतूने राज्य शासनाने शाळांच्या वेळा उशिरा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आगामी निवडणुकांच्या कामांमुळे हा निर्णय गुंडाळला जात असून, पुन्हा एकदा शाळा सकाळी लवकर भरवल्या जात आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मानसिकतेवर होतोय विपरित परिणाम
तज्ज्ञांच्या मते, सकाळी लवकर शाळा असल्याने लहान मुलांची झोप अपूर्ण राहते. यामुळे मुलांची चिडचिड वाढणे, अभ्यासात लक्ष न लागणे आणि मानसिक ताण येणे असे प्रकार घडतात. मुलांच्या याच सायकॉलॉजीचा विचार करून वेळ बदलण्यात आली होती. मात्र, आता निवडणूक कामांचे कारण पुढे करून मुलांच्या आरोग्याला दुय्यम स्थान दिले जात आहे.
शिक्षकांचे मूळ काम बाजूला; मग शिक्षणावर फोकस कसा राहणार?
या सगळ्यात आणखी एक गंभीर बाब म्हणजे शिक्षकांवर टाकण्यात आलेला अशैक्षणिक कामांचा बोजा. शिक्षकांचे सर्वात महत्त्वाचे काम हे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आहे. मात्र, त्यांना त्यांचे हे महत्त्वाचे काम सोडून सातत्याने निवडणुकीच्या (BLO) आणि इतर प्रशासकीय कामांना जुंपले जात आहे. जर शिक्षकांना दुसरेच काम दिले, तर त्यांचा शिकवण्यावर आणि विद्यार्थ्यांवर किती फोकस राहणार? असा अत्यंत महत्त्वाचा सवाल आता उपस्थित होत आहे.
केवळ प्रशासकीय कामे उरकण्यासाठी शिक्षकांना वेठीस धरल्यास भविष्यातील पिढी कशी घडणार आणि शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार, याचा गांभीर्याने विचार आता सरकारने करण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548129








