लेडी सिंघम तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची वाळूमाफियांवर करडी नजर; सीना नदी परिसरात महसूल विभागाची कडक गस्त:-


लेडी सिंघम तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची वाळूमाफियांवर करडी नजर; सीना नदी परिसरात महसूल विभागाची कडक गस्त:-

जि. सोलापूर, ता. करमाळा :दी. 12 जुलै :-करमाळा तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने सीना नदीचे पात्र कोरडे असून, या परिस्थितीचा गैरफायदा घेत अवैध वाळू उपसा होण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी महसूल विभागाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सीना नदी परिसरासह तालुक्यात विशेष गस्त मोहीम सुरू करण्यात आली आहे.

जून आणि जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उपलब्ध आहे. त्यामुळे अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने विशेष पथके तैनात केली असून, दिवसरात्र गस्त घालण्यात येत आहे. संशयास्पद वाहनांवर लक्ष ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जात आहे.

‘लेडी सिंघम’ म्हणून ओळख असलेल्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी यापूर्वीही अवैध वाळू तस्करीविरोधात कठोर कारवाया केल्या आहेत. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वाळूमाफियांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून महसूल विभागाच्या या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

तहसीलदार ठोकडे यांनी नागरिकांनाही आवाहन केले असून, तालुक्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास ती तात्काळ महसूल विभागाला कळवावी, असे सांगितले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे अवैध वाळू उपशावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!