मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया; १.१९६ किलो वजनाच्या नवजात बाळाचा जन्मजात दात यशस्वीरित्या काढला
मुंबई:
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिन्याच्या मुदतपूर्व (प्री-मॅच्युअर) आणि केवळ १.१९६ किलो वजनाच्या नवजात बाळाच्या तोंडातील जन्मजात दात यशस्वीरित्या काढून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
बाळाचा जन्मजात दात सैल असल्यामुळे तो श्वासनालिकेत जाण्याची तसेच स्तनपान करताना अडथळा निर्माण होण्याची गंभीर शक्यता होती. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन बालदंततज्ज्ञ डॉ. श्रेया बापट आणि बालरोग विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने नवजात अतिदक्षता विभागात (NICU) अत्यंत काळजीपूर्वक ही दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पाडली.
शस्त्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय यशस्वीरित्या पूर्ण झाली असून बाळाची प्रकृती स्थिर आहे. मुदतपूर्व जन्म आणि अत्यंत कमी वजन असूनही वेळेवर योग्य उपचार मिळाल्यामुळे बाळाला संभाव्य जीवघेण्या धोक्यापासून सुरक्षित करण्यात डॉक्टरांना यश आले.
या यशस्वी उपचारामुळे रुग्णालयातील वैद्यकीय पथकाच्या तत्परतेचे आणि कौशल्याचे कौतुक होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी







